माजी खासदार प्रकाश जाधव यांनी नगर परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांना फटकारले
२७ जानेवारी पर्यंत दुकानदारांचे पुनर्वसन न झाल्यास तीव्र आंदोलनाचा ईशारा
कन्हान : - कन्हान - पिपरी नगर परिषद प्रशासनाच्या अन्यायकारक कारवाईमुळे रस्त्यालगत व्यवसाय करणाऱ्या ९० दुकानदारांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे . अनेक वर्षांपासून रस्त्याच्या कडेला व्यवसाय करून जीवन चालवणाऱ्या या दुकानदारांना हटवून त्यांचे रोजगार हिरावले गेले आहेत . या पार्श्वभूमीवर माजी खासदार प्रकाश जाधव यांनी मुख्याधिकारी दिपक घोडके यांना चांगलेच फटकारले .
ग्रोमोर व्हेंचर्स ले - आउट धारकाच्या हितासाठी केलेल्या कारवाईवर प्रकाश जाधव यांनी तीव्र शब्दांत टीका केली . "तुमचं प्रशासन केवळ एक पुंजीपतीला लाभ पोहोचवण्यासाठी काम करत आहे का ? ९० दुकानदारांना रोजगारहीन करून त्यांच्या कुटुंबांवर उपासमारीची वेळ आणली आहे . यामुळे एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाला , तर त्याला तुम्ही जबाबदार असाल ," असे प्रकाश जाधव यांनी ठणकावून सांगितले.
दुकानदारांना हटवतांना प्रशासनाने कोणतीही नियमांची पूर्तता केली नाही . ना समित्या बनवल्या , ना यादी तयार केली , आणि ना पुनर्वसनाचा विचार केला . उलट , गोर , गरीब दुकानदारांना हटवण्यासाठी जेसीबी , क्रेन , आणि बुलडोझर सारखी यंत्रे वापरून कारवाई केली गेली .
"तुम्ही प्रशासकीय प्रमुख आहात , पण तुम्ही लोकांच्या हिताचा विचारच करत नाही . तुम्ही कोर्टाच्या आदेशाचा चुकीचा अर्थ काढून कारवाई केली आहे . तुम्हाला लाज कशी वाटत नाही ? दुकानदाऱ्यांकडून कर घेताना तुम्हाला काहीच गैर वाटलं नाही का ?" अशा शब्दांत प्रकाश जाधव यांनी मुख्याधिकारी दिपक घोडके यांना धारेवर धरले .
२७ जानेवारीपर्यंत हटवलेल्या दुकानदारांचे पुनर्वसन झाले नाही , तर तीव्र जनआंदोलन छेडले जाईल , असा स्पष्ट ईशारा प्रकाश जाधव आणि हाॅकर्स युनियन कृती समिती कन्हान च्या दुकानदारांनी दिला आहे .
मुख्य महामार्गावरच्या अतिक्रमण कारवाईत फक्त गरीब दुकानदारांना लक्ष्य करण्यात आले . नगर परिषद , पोलीस स्टेशन , आणि इतर शासकीय कार्यालयां समोरील अतिक्रमण का हटवले नाही , असा सवाल दुकानदारांनी उपस्थित केला आहे .
या शिष्टमंडळात चिराल वैद्य , प्रशांत पाटील , दिगंबर हारगुडे , नुसरत परवेज , अमोल रामटेके , आणि वनिता बुंदेलिया यांसह अनेक दुकानदार आणि हॉकर्स युनियन कृती समितीचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कन्हान प्रतिनिधि - ऋषभ बावनकर
नगर परिषद प्रशासनाच्या या भोंगळ कारभारावर तातडीने उपाययोजना न केल्यास कन्हान शहरात जनआंदोलनाची ठिणगी पडणार , हे निश्चित आहे . प्रशासनाने गरीब जनतेच्या भावनांचा आदर करून योग्य पावले उचलावी , अशी मागणी सर्वसामान्य जनतेतून होत आहे.
0 टिप्पण्या
thank you for, you give me your most important time